Thursday, 7 July 2016

योग शिबीर काश्मीरमधले

"निव्वळ योग शिकायला काश्मीरपर्यंत जायची गरज आहे का?" असा प्रश्न माझ्या बायकोने विचारला होता जेंव्हा मी तिला माझा योग शिबीराला जायचा मानस सांगितला होता तेंव्हा. योगासन, प्राणायाम आणि त्याचे तत्वज्ञान शिकवणाऱ्या बऱ्याच संस्था आणि व्यक्ती भारतभर विविध ठिकाणी पसरलेल्या असताना एखाद्या विशिष्ट गोष्टीचा अट्टहास कशाला असा प्रश्न साहजिक पडू शकतो.

कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्राला भेट दिल्यानंतर आणि त्यांच्या योग विषयातील कार्यक्रमाबद्दल जाणून घेतल्यानंतर मला असं वाटू लागलं की मी जे शोधतोय ते मला कदाचित येथे मिळू शकेल. एक हिंदू विचाराची संस्था असली तरी मला विवेकानंद केंद्राची संशोधनकेंद्री कार्यपध्दती योग्य वाटली होती. योग म्हणजे निव्वळ आसन व प्राणायाम करणे व आरोग्य चांगले राखणे नसून आपल्या नेहमीच्या जीवनाशी योगाचा मेळ कसा साधायचा, त्याचे तत्वज्ञान काय आहे हे सगळे जाणून घेणे मला महत्वाचे वाटत होते. मग विचार केला सरळ त्यांच्या एखाद्या शिबीरात दाखल होऊन एकदा अनुभव तरी घेऊन पहावा. मला सोयिस्कर कालावधी काश्मीरच्या शिबीराचाच दिसत होता त्यामुळे सरळ त्यासाठी नोंदणी करून टाकली आणि वेळ आल्यावर तिथे गेलो.

शिबीर ज्या ठिकाणी घेण्यात आले ती जागा म्हणजे श्री रामकृष्ण महासम्मेलन आश्रम अनंतनाग जिल्ह्यातील अच्छाबल या गावात आहे. आश्रमाच्या जागेला नागदंडी असे म्हटले जाते. काश्मीरी भाषेत नाग म्हणजे झरा आणि नावाप्रमाणे येथेही एक स्वच्छ पाण्याचा खळाळता झरा आहे. स्वामी अशोकानंद नावाच्या रामकृष्ण परमहंसांच्या विचारपरंपरेतील एका संन्याश्याने ह्या ठिकाणी तपसाधना केली. त्यांनी व त्यांच्या भक्तगणांनी हा आश्रम बांधला. स्वामीजींच्या पश्चात ह्या आश्रमाचे व्यवस्थापन विवेकानंद केंद्रातर्फे करण्यात येते. आश्रमाची एक स्थानिक व्यवस्थापन समितीही असून त्याचे सदस्य प्रामुख्याने अनंतनाग भागातून विस्थापीत झालेले काश्मीरी पंडीत आहेत. स्वामी अशोकानंदांच्या काळात ह्या हिंदू मंडळींचा आश्रमाशी संपर्क असे. तिथल्या दहा दिवसांच्या वास्तव्यादरम्यान देशाच्या विविध भागात स्थायिक झालेले परंतु स्वामीजींच्या आठवणीमुळे परत एकदा आश्रमाला भेट देणारे बरेच काश्मिरी पंडीत लोक भेटले.
 
सभागृह

स्वामी अशोकानंद समाधी मंदीर

योग शिबीराची सुरूवात २० जुनला झाली आणि बरोबर १० दिवसांनी २९ जुनला त्याचा समारोप झाला. दररोज सकाळी साडेपाच वाजल्यापासून सुरू होणारे शिबीरातील विविध उपक्रम रात्री साडेनऊ वाजता संपत असत. शिबीर आयोजकांचीच नव्हे तर शिबीरार्थींचीही वेळ पाळण्याबाबतची व कार्यक्रम सहभागातील शिस्त वाखाणण्यासारखी होती. थोडी कुरकुर काही जणांनी त्याबद्दल केली तरी बहुतांशी सर्वांनी आखून दिलेले नियम बऱ्याच अंशी पाळले. हे सर्व काटेकोरपणे पाळणाऱ्यांमध्ये जसे सत्तरी ओलांडलेले लोक होते तसेच नवतरूणही होते हे विशेष. श्लोक पठण, योगासन व प्राणायाम अभ्यास, श्रमसंस्कार, गीतेतील कर्मयोगाचे विश्लेषण, योग तत्वज्ञान व अन्य विषयांवरील व्याख्याने, गटचर्चा, सायंकालीन भजने इतकेच नव्हे तर मनोरंजनपर खेळही होते. इतका भरगच्च कार्यक्रम असल्यामुळे एक मात्र झाले की वैयक्तिक असा मोकळा वेळ फारच कमी मिळाला. अर्थात तो शिबीर संपल्यानंतर मिळणारच असल्याने मला व्यक्तिशः त्याचे फारसे दुःख झाले नव्हते.
 
शिबीरातील सहभागी एक दिवसाच्या सहली दरम्यान
माझा स्वभाव बराचसा नास्तिक वळणाचा आहे. साधारणतः देवपूजा, भजने, मंत्रपठण अश्या गोष्टींपासून चार हात दूरच रहायचा प्रयत्न करत असलो तरी ह्या शिबीराची एकूण रचना आस्तिकतेची होती हे स्वीकारले होते. आपण तिथे शिकायला गेलो आहोत आणि पाण्यात पडल्याशिवाय पोहायला शिकता येत नाही ह्या बाबी मनात पक्क्या असल्यामुळे शिबीराच्या सर्वच्या सर्व कार्यक्रमांमध्ये पूर्णतः सहभागी होण्याचा प्रयत्न केला. गीतेतील कर्मयोगाची आणि आदि शंकराचार्यांनी लिहीलेल्या निर्वाणषटकाची जवळून ओळख होणे हा मला त्यापासून झालेला सर्वात मोठा फायदा. शाळेतील माझ्या आवडत्या संस्कृत भाषेच्या पुन्हा एकदा थोडंफार जवळ जाता येणं हा एक अजून आनंदाचा विषय होता. एकंदरीत हिंदू तत्वज्ञान मुळातच फार गोल गोल फिरत राहतं त्यामुळे त्याच्यावरच्या व्याख्यानांदरम्यान मात्र मला कधीच झोप आवरता आली नाही.

योगासन आणि प्राणायाम ह्या गोष्टींविषयींची माहिती आणि प्रसार भारतात जवळजवळ सर्वच ठिकाणी होत आहे. परंतु हा एक अनुभवाचा भाग आहे आणि त्यामागे असलेले शास्त्रशुध्द तंत्र पाळले जाण्याच्या नावाने मात्र बऱ्याच ठिकाणी बोंब असते. विवेकानंद केंद्राची भगिनी संस्था असलेल्या स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेने या विषयावर बरेच सखोल काम केले आहे. त्यामुळे तेथे प्रमाणीकृत झालेले तंत्रच शिबीरात वापरले जाते. मर्यादीत शिबीरार्थी संख्येमुळे शक्य झालेले वैयक्तिक लक्ष आणि तंत्रशुध्दतेवर दिलेला भर ह्यामुळे योगासने शिकण्यामध्ये फार अडचणी जाणवल्या नाहीत. मी पुर्वीपासून योगासने नियमीत करत नसल्यामुळे व शरीराला एका विशिष्ट स्थितीची अतिसवय झाल्यामुळे शिबीराच्या सुरूवातीला कंबरेत मागच्या बाजूला वाकणे, बराच वेळासाठी खाली बसणे अश्य़ा गोष्टी करण्यामध्ये खूप त्रास झाला. परंतु जसजशी योगासने करत गेलो तसतशी दहा दिवसांत बरीच सुधारणा झाली. योगासन शिक्षक कल्पना दिदी ह्यांनी योगासनांमधले बरेच बारकावे व्यवस्थित समजावून सांगितले. आता परतल्यानंतर योगासने व प्राणायाम नियमीत करण्याचा संकल्प अत्यावश्यक आहे.
 
एक शिबीरार्थी अनुलोम विलोम करताना
शिबीरातील जेवण कमी तिखट, कांदा रहित व पूर्णतः शाकाहारी असले तरी बेचव मात्र नव्हते. जेवण बनवणारे आचारी जम्मू विभागातील असल्यामुळे त्यांच्या डोगरी खाद्यशैलीचे अनेक पदार्थ जेवणात होते. स्थानिक डोगरी जेवणामध्ये भात भरपूर खातात आणि चपात्या फारश्या केल्या जात नाहीत. आलेल्या आचाऱ्यांना त्या विशेष जमतही नव्हत्या त्यामुळे आमच्या जेवणात भातावरच जोर होता. राजमा, कडम की साग (नवलकोलच्या पानांची भाजी), अंबल (भोपळ्याची आंबट गोड रस्सा भाजी), दुध घातलेली पनीरची रस्साभाजी असे अनेक नावीन्यपूर्ण पदार्थ चाखायला मिळाले. काही संध्याकाळी कहवाचा, खास काश्मिरी चहाचा आस्वाद घ्यायला मिळाला. पुण्याहून आलेल्या विवेकानंद केंद्राच्या प्रेमळ स्वभावाच्या कार्यकर्त्या रजनीताई ह्यांनी त्यांना पोहे आणि उपमा कसा बनवायचा ते शिकवून त्यांच्याकडून करूनही घेतले.

शिबीर संपायच्या आदल्या दिवशी परीक्षा घेतली. कडक शिस्तीच्या शिबीर प्रमुख मंगलाताई ओक ह्या माझ्या सख्ख्या मामेबहिणीच्या सासूबाई असल्या तरी पेपर कठीण होता आणि परीक्षेला सामोरे जाण्यात काही हयगय नव्हती. अर्थात परीक्षा ही स्वतःलाच तपासून पाहण्यासाठी होती त्यामुळे लेखी पेपरात पास झालो तरी आपण किती पाण्यात आहोत ते मात्र चांगलेच समजले. 
परीक्षेची वेळ
 एकंदरीत शिबीराबद्दलचे माझे मत अतिशय चांगले असले तरीही विवेकानंद केंद्राच्या कार्यपध्दतीत एक प्रकारचा स्वमताचा अतिआग्रह जाणवला. त्यामुळे अन्य विचारपध्दती व कार्यशैली ह्याबाबतची स्वीकारार्ह्यताही फारच कमी आहे असे वाटले. अर्थात ज्यांना त्या संघटनेचे कार्य करायचे आहे त्यांच्य़ासाठी हा मुद्दा महत्वाचा ठरेल. मला तेथे भेटलेल्या सर्वच कार्यकर्त्यांच्या त्यांच्या कामाबद्दल असलेल्या निष्ठेचा खूप आदर वाटला. जयपूरहून आलेले दिनेश आणि सुरेश हे दोघे विद्यार्थी दशेतील तरूणही ज्या आत्मविश्वासाने व पूर्ण जीव लावून शिबीराचे काम करत होते ते पाहून त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच होते.

शिबीराच्या शेवटच्या दिवशी केलेल्या समारोपाच्या कार्यक्रमात तेथील स्थानिक राजकीय नेत्यांना पहायला व ऐकायला मिळणे हा एक वेगळाच अनुभव होता. काश्मीरमधील राज्यसभेचे खासदार जनाब नझीर अहमद लावे ह्यांचे भाषण विशेष लक्षात राहीले. त्यांचा स्वामी विवेकानंद व त्यांच्या विचारांचा अभ्यास, त्यांचे मुलींच्या शिक्षणासाठीचे प्रयत्न, स्थानिक काश्मीरी जनतेमध्ये भारतीय लोकशाहीबद्दल विश्वास रूजवण्यासाठी ते करत असलेले काम व त्यासाठी अतिरेकी प्रवृत्तींकडून त्यांना सहन करावा लागणारा विरोध हे सर्व मी प्रथमच ऐकत होतो. अश्या व्यक्तींच्या कामाची ओळख खरे तर पूर्ण देशभरात होणे गरजेचे आहे.
 
समारोपाच्या कार्यक्रमात अनुभव कथन करताना
शिबीर संपवून परतीच्या प्रवासाला लागलो तरी मधून मधून मन्त्र, भजनं आणि विवेकानंद केंद्राची प्रार्थना इ गुणगुणत होतो. इतके दिवस सतत त्याच गोष्टींचे उच्चारण केल्याचा परिणाम होता. वाईट नव्हता. योग ह्या विषयात फार मोठे काही ज्ञान मिळवले नसले तरी त्या विषयात आपल्याला अधिक रस आहे हे निश्चित समजले होते. श्री. श्रीरामजी आगाशे ह्यांचे ज्ञानयोग ह्या विषयातले अभ्यासपूर्ण व्याख्यान ७५ टक्क्यापेक्षा अधिक भाग डोक्यावरून गेले होते पण जे काही समजले त्यावरून त्याबद्दल अधिक वाचायला, माहिती मिळवायला पाहीजे इतके नक्की कळले होते. ह्या वर्षी वाचायची म्हणून मी काही पुस्तकांची यादी केली होती त्यामध्ये बरीच भर पाडून मी तिथून परतलो.

माझ्या ओळखीचे एक ऑस्ट्रेलियन जोडपे मी ज्याकाळात काश्मीरमध्ये योग शिबीरात होतो त्या काळात पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. जेंव्हा मला त्यांच्या ह्या प्रवासाच्या नियोजनाबद्दल समजले तेंव्हा मी त्यांना गंमतीने म्हणालो होतो की मी त्यावेळेला कुठेतरी तु्म्ही असलेल्या डोंगराच्याच पलिकडे ध्यान लावून बसलेलो असेन. त्यातील पत्नी सौ. मार नॉक्स लगेच मलाही गंमतीने म्हणाली होती की मग तुझ्या शुभलहरी आमच्यासाठी डोंगरापल्याड पाठव. हे सगळे खरोखर शक्य आहे किंवा नाही ह्याची अनुभूती मला नाही पण योगाद्वारे वैयक्तिक आणि सामाजिक मनःशांतीचे काम निश्चित होऊ शकेल ह्या बद्दल ठाम विश्वास मात्र निर्माण झाला आहे.
Post a Comment